नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वृद्धाश्रमाच्या कार्यालयाची काच फोडून, जाळी तोेडून, आग लावून अनेक वस्तू जाळून नुकसान केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी डॉ. रमेश आनंदराव सोनवणे (रा. कोठारी कन्या शाळेजवळ, जेलरोड, नाशिकरोड) हे जेलरोड येथील लक्ष्मीनगर बस स्टॉपशेजारी असलेल्या यस केअर सेंटर वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. दि. 20 मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आरोपी प्रमोद (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने या वृद्धाश्रमाच्या कार्यालयाची आधी काच फोडून जाळी तोडली.
त्यानंतर कार्यालयात काही तरी ज्वलनशील पदार्थ टाकून आगपेटीच्या काडीने आग लावली. या आगीमुळे कार्यालयातील खुर्च्या, कपाट, टेबल, फॅन, इन्व्हर्टर, ट्यूबलर बॅटरी, सीसीटीव्हीचा मॉनिटर, स्कॅनर, प्रिंटर व टेबलांवर ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे जळून त्यांचे नुकसान झाले. चव्हाण याची प्रेयसी या वृद्धाश्रमात कामाला होती. त्यामुळे तो नेहिमी तिला भेटायला तिथे यायचा.
ही गोष्ट तेथील लोकांना न पटल्याने त्यांनी तिला कामावरून काढून टाकले. या गोष्टीचा राग मनात धरून प्रमोदने हे कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात प्रमोद चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भोळे करीत आहेत.