Nashik : बांधकाम अपूर्ण असतानाही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दाखवून वृद्धेची 7 कोटी रुपयांची फसवणूक
Nashik : बांधकाम अपूर्ण असतानाही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दाखवून वृद्धेची 7 कोटी रुपयांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बिल्डिंगचे बांधकाम अपूर्ण असतानाही पूर्णत्वाचा दाखला दाखवून एका वृद्धेची सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका सीएसह पाच बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही 60 वर्षीय वृद्ध महिला असून, त्या थत्तेनगर येथे राहतात. त्यांच्या मालकीचा कॉलेज रोड परिसरात नगररचना योजना क्रमांक दोननुसार अंतिम प्लॉट क्रमांक 481 आहे. या प्लॉटवर कांचन अ‍ॅव्हेन्यू या नावाच्या बिल्डिंगचे बांधकाम करण्याचे ठरलेे; मात्र या बिल्डिंगचे बांधकाम अपूर्ण व अर्धवट सोयीसुविधा आहेत. असे असतानाही या बिल्डिंगचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दि. 18 डिसेंबर 2021 चा मनपाकडील बांधकाम पूर्णत्वाचा दाखला फिर्यादी महिलेला दाखवून त्यांचा विश्‍वास संपादन केला.

त्यानंतर संगनमत करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने आरोपी सीए संजय धनराज छाजेड (रा. सौभाग्यनगर, गंगापूर रोड, नाशिक) यांनी मध्यस्थी करून मे. कांचन डेव्हलपर्सचे भागीदार मुकेश नवीनचंद्र जैन, दुर्वेश नवीनचंद्र शहा, सुकेश नवीनचंद्र शहा, सुभाष हिरालाल बंब, आरती संजय छाजेड (रा. कांचन मेडिकलजवळ, नामको बँकेसमोर, जुने सिडको) यांनी संगनमत करून फिर्यादी महिलेकडून 7 कोटी 3 लाख 3 हजार 500 रुपये चेकद्वारे स्वीकारले. त्यानुसार खरेदी खत, दस्त नोंदवून देत त्यांची आर्थिक फसवणूक केली.

हा प्रकार दि. 11 ऑक्टोबर 2022 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group