
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरपासून ते तिच्या प्रवाहापर्यंत स्वच्छतेसाठी विशेष योजना आखण्यात आल्या असून, त्या पर्यावरणपूरक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
महसूल विभागीय आयुक्त कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाकडून सहा चित्रफितींच्या माध्यमातून माहिती घेतली. त्या दरम्यान त्यांनी प्रशासनाच्या कार्याची स्तुती करत आवश्यक सूचना दिल्या. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वीच गोदावरी नदी पूर्णपणे स्वच्छ केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महानगरपालिका आणि राज्य सरकार यांचा समन्वय असणार आहे.
धुळे येथील बहुचर्चित प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून तपास योग्य दिशेने सुरू आहे. पोलीस यंत्रणेवर विश्वास व्यक्त करत त्यांनी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता आणि महिला दक्षता समितीला विश्वासात घेतले असते, तर हे दुर्दैवी प्रकरण टाळता आले असते.
सध्या हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महिला दक्षता समितीच्या भूमिकेला अधिक महत्त्व द्यायला हवे आणि पोलिसांनी समितीशी समन्वय साधून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यामुळे त्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. त्याचप्रमाणे नाशिक आणि महाराष्ट्र राज्याचा नावलौकिकही जागतिक पातळीवर होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाबाबत विचारले असता, डॉ. गोऱ्हे यांनी स्मितहास्य करत ‘‘मला वेळ नाही, त्यामुळे मी पुस्तक वाचलेले नाही,’’ असे उत्तर देत पत्रकार परिषद संपवली.