नाशिक: शहरात दुपारच्या वेळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले असून, शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर डबके साचल्याचे दिसून आले. आज दुपारच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
अनेक नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. दिवसभरामध्ये 21 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
नाशिक शहरासह नाशिकरोड, पाथर्डी फाटा, पंचवटी, कॉलेजरोड, अंबड एमआयडीसी परिसरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. तर या पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू मागील 24 तासांमध्ये झाला आहे.
शहरातील काही भागांत चार ते पाच फूट पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी वाहने बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या असून, वाहतूक पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मान्सुनच्या पुर्वीच नालेसफाईची कामे पुर्ण करावी लागणार आहे.
हजारो हेक्टरवरील पिके खराब झाली असून अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे.
६०० गावांतील जवळ जवळ १४ हजारहुन अधिक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
जवळपास ३ हजार ४५४ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक यंत्रणेकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरूच असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
यात प्रामुख्याने आंबा, कांदा आणि भाजीपाला पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर फळबागांचे देखील नुकसान झाले. यात सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबक, सिन्नर तालुक्यासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याचे बघायला मिळत आहे.