
सातपूर (भ्रमर प्रतिनिधी) :- परिसरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामारी, घरफोडीचे प्रकार सातत्याने सुरूच आहे. त्यातच सातपूरच्या अशोकनगर जाधव संकुल परिसरात रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
संशयिताची वहिनी कामावरून घरी आली असता, कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराचे कुलूप न तोडता घरात प्रवेश कोणी केला, असा प्रश्न त्यांना पडला; मात्र खिडकीच्या गजांना वेल्डिंग केल्याचे व कलर मारल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, ही घरफोडी घरातल्याच व्यक्तीने केल्याचे समोर आले. ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सवयीमुळे घरातील 15 तोळे सोने दिरानेच चोरल्याची बाब समोर आली. हरिष चव्हाण असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी तासाभरामध्ये शोध घेऊन संशयिताची तपासणी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच चोरलेले सोने ज्या सोनाराला विकले आहे, त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.