गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असून अनेक धक्कादायक गुन्हे उघडकीस येत आहेत. पती - पत्नीचे छोटे मोठे वाद विवाद हे काही नवे नाहीत पण कधी कधी हे वाद विकोपाला जाऊन या वादाचा शेवट किती भयावह असू शकतो याचा प्रत्येय काही घटनांमधून पाहायला मिळतो अशीच एक घटना आता समोर आलाय आहे.
मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. 15 वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. पण या प्रेमाचा भयानक शेवट झाला आहे. आरोपीनं महिलेची हत्या करून तिचा मृतदेह घरातील पलंगात कोंबला होता. यानंतर आरोपी पळून गेला होता. दरम्यान, घरातून उग्र वास येऊ लागल्यानंतर हे मुंबईला हादरवणारं हत्याकांड समोर आलं आहे.
रागिणी सावर्डेकर असं हत्या झालेल्या ६३ वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मुंबईच्या गोरेगाव परिसरात आपला पती प्रताप बस्कोटी सोबत वास्तव्याला होती. आरोपी प्रतापने सोमवारी रागिणी यांची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने रागिणी यांचा मृतदेह पलंगात लपवला आणि शेजाऱ्याकडे चावी देऊन पळ काढला. घर सोडताना आरोपीनं आपण पत्नीसह बाहेर जात आहोत, असं सांगितलं होतं. मात्र चार दिवस उलटूनही दोघे परत आले नाहीत.
दरम्यान, आरोपीच्या घरातून उग्र वास येऊ लागला. यामुळे शेजारी राहणाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी घराचा दरवाजा उघडून आतमध्ये पाहिलं असता पलंगात कोंबलेल्या अवस्थेत रागिणी यांचा मृतदेह आढळून आला. हत्येची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता घडलेला प्रकार पाहून पोलीसही हादरले.
या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी प्रताप बस्कोटी याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र संपत्ती बळकावण्यासाठी ही हत्या केल्याचा आरोप रागिणी यांच्या कुटुंबीयांचा आहे. ज्या घरात हत्या झाली, ती चाळीतील खोली रागिनी यांच्या नावावर होती. हीच खोली बळकवण्यासाठी प्रतापने रागिणीची हत्या केली असावी, असा नातेवाईकांचा सशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रतापचा शोध घेतला जात आहे.