राज्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले असून अतिशय अशा किरकोळ कारणांवरूनही मोठं मोठे गुन्हे सर्रास पणे केले जातात. त्यामुळे कायदा वर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान अशुच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मुंबईहून इंदोरकडे निघालेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये एका महिलेवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पालघर रेल्वे हद्दीत घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
सदर महिला आपल्या मुलांना घेण्यासाठी मुंबईहून इंदोरकडे प्रवास करत होती. दरम्यान, ट्रेनमधील तिच्या कोचमध्ये असलेल्या काही प्रवाशांशी तिचा किरकोळ वाद झाला. वादाचे रुपांतर बाचाबाची आणि नंतर हाणामारीत झाले. या वादातून संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेवर हल्ला केला. त्यांनी महिलेच्या हातावर व पायावर धारदार चाकूने वार केले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेमुळे अवंतिका एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पालघर लोहमार्ग पोलीसांनी त्वरीत तपास करत ट्रेन पुढे गेल्यावर वापी स्थानकात आरोपींना ताब्यात घेतले. सध्या जखमी महिलेला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.