२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे . या घटनेत २८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचा सर्वच स्थरातून निषेध करण्यात येत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या हल्ल्यात निष्पाप भारतीयांचे जे प्राण गेले, त्याबद्दल अंबानी यांनी सखोल दुःख व्यक्त केले असून जखमींना संपूर्ण आणि लवकर बरे होण्यासाठी आपल्या प्रार्थना त्यांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.
मुकेश अंबानी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रिलायन्स कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वतीने मी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप भारतीयांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतो. पीडितांच्या कुटुंबीयांना आमच्या अंतःकरणापासून संवेदना आणि जखमींना लवकर बरे होण्याच्या प्रार्थना."
यासोबतच अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील 'सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल'मध्ये सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला पाठिंबा दर्शवताना अंबानी म्हणाले, दहशतवाद ही संपूर्ण मानवजातीची शत्रू आहे. त्याला कुठल्याही प्रकारे पाठिंबा देणं अक्षम्य आहे. आम्ही भारताचे माननीय पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशासोबत खंबीरपणे उभे आहोत.