२२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याने संपूर्ण देश हदराला आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर भारत एक्शन मोड मध्ये आला असून भारताने पाच धोरणात्मक निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला असून पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताने काही कठोर निर्णय घेण्याबरोबर दिल्लीतील उच्चायुक्तालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. एकीकडे असं असतानाच दुसरीकडे नवी दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये चक्क केक मागवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर एक कर्मचारी चक्क केकचं बॉक्स घेऊन जाताना दिसला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे सारं सेलीब्रेशन कशासाठी असा प्रश्न या केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला विचारला असता त्याने काहीही उत्तर दिलं नाही. ही व्यक्ती हातातील बॉक्स घेऊन उच्चायुक्तालयाच्या मुख्य द्वारातून आतामध्ये शिरली.
दरम्यान , जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कट कारस्थान पाकिस्तानामध्ये शिजल्याची दाट शक्यता असतानाच दुसरीकडे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक मागवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं कोणत्या गोष्टीचं पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये सेलीब्रेशन झालं हा कुतूहलाचा प्रश्न आहे.