गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णेतेने कहर केला आहे. या उष्णतेने राज्यातील जनता अक्षरशः त्रस्त झाली असून लोकं आजारी देखील पडत आहेत. दरम्यान, आता अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पारा ४० पार गेला आहे.अशातच जळगावध्ये उष्माघातामुळे एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना भडगाव तालुक्यात तेरा वर्षीय दिनेश पवार या मुलाचा उष्माघात सदृश आजाराने मृत्यू झाला आहे. तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले असताना ही घटना घडली आहे. स्थानिक खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेशमध्ये उलटी, जुलाब, ताप, बीपीमध्ये चढ-उतार अशी उष्माघाताची लक्षणे आढळून आली होती. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान दिनेश मागील दोन-तीन दिवसापासून उन्हात खेळत असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेशच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
सध्या उन्हाची तीव्रता ही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्ण देखील वाढले आहेत. तापमान वाढल्यामुळेच उष्माघाताची रुग्ण वाढतात हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे कुठलेही काम करायचे असल्यास किंवा उन्हामध्ये बाहेर फिरायचे टाळल्यास आपण उष्माघातापासून स्वतःचा बचाव करू शकतो. खूपच महत्त्वाचे काम असेल तर सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी चार ते त्यापुढील वेळेमध्ये आपण ते काम करू शकतो. जर आपल्याला ताप आली चक्कर येत असेल किंवा डोकेदुखी असेल खूप घाम येत असेल बेचैन अस्वस्थता वाटत असेल तर घाबरून न जाता जवळच्या दवाखान्यात दाखवावे.