नाशिक :- रिक्षा चालकांबाबत दोन घटना ताज्या असतानाच पुन्हा एक लज्जास्पद प्रकार नाशिक मध्ये घडला.
रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय पीडितेसमोर रिक्षाचालकाने नग्न होत तिचा पाठलाग करुन अश्लील शब्द वापरले. नंतर या रिक्षाचालकाने ती महिला बसलेल्या सिटी लिंक बसची काच फोडून भर रस्त्यात धुडगूस घातला. सराईत गुन्हेगार व रिक्षाचालक संशयित मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख (वय २०, रा. बागवान पुरा, जुने नाशिक) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
पीडिता गुरुवारी (दि. १०) रात्री दहा वाजता उपनगर येथून द्वारका भागात येत होती. तेव्हा बोधलेनगर ते द्वारका सर्कलदरम्यान, संशयित मिजानने रिक्षेतून तिचा पाठलाग सुरु केला. यावेळी त्याने पीडितेस वेळोवेळी ‘तुमको किधर जाना है?’ असे विचारून वाईट नजरने बघितले. नंतर अश्लील हातवारे करून पाठलाग केल्यावर द्वारका सर्कल येथे त्याने अंगावरील सर्वच कपडे काढून नग्न होत तिला अश्लील इशारे केले. यानंतर तिला ‘तुझे छोडुंगा नहीं’, असे म्हणत तिचा विनयभंग केला. या घटनेने पीडिता पूर्णतः घाबरली. तिने दुसऱ्या दिवशी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जाऊन रिक्षाचालकाविरोधात फिर्याद दाखल केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही व अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे या रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.