काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण झाली होती. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीला धमक्या मिळत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता याबद्दल झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकी मिळाली आहे. झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचे बोललं जात आहे. झिशान सिद्दीकीला धमकी देणाऱ्या व्यक्तीने ईमेलद्वारे १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा धमकी देणारा दर ६ तासांनी धमकीचे ईमेल पाठवत आहे, असंही झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.
झिशान सिद्दीकी यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी झिशान यांनी त्यांना मिळालेल्या धमकीत काय, किती कोटींची खंडणी मागितली आणि त्यांचा कोणावर संशय आहे का याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मी पोलिसांना याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. सध्या ते याबद्दलचा तपास करत आहेत, अशी माहिती झिशान सिद्दीकींनी दिली.
झिशान सिद्दीकी काय म्हणाले?
“मी तुम्हाला विनंती करतो की मला आणि माझ्या कुटुंबाला थोडी प्रायव्हसी द्यावी. मला तीन चार दिवसांपासून मेल येत होते, हे काल समजले. त्यानंतर मी पोलिसांना याबद्दल कळवले. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या घरी आले होते. त्यांनी घरी येऊन याबद्दल स्टेटमेंट घेतले. याबद्दल पोलीस कारवाई करत आहे. त्या मेलमध्ये काय होतं, हे सांगण्यास मला मनाई करण्यात आली आहे. पण त्यात मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच काही रक्कम माझ्याकडून मागण्यात आली होती. याबद्दल मी पोलिसांना कळवले आहे. ते याबद्दल तपास करत आहेत”, असे झिशान सिद्दीकी म्हणाले.
“तुमच्याकडून १० कोटीची रक्कम मागितली गेली हे खरंय का? डी गँगचा दावा त्यात आहे का? याबद्दल विचारले असता झिशान सिद्दीकी यांनी अशाच प्रकारचे काहीतरी होते. मला जे काही मेल्स, मेसेज मिळाले आहेत. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे याबद्दल पोलीस तुम्हाला सविस्तर सांगू शकतात. मला कोणावरही संशय नाही”, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.
“माझ्या वडिलांसोबतही असे झाले होते, त्यामुळे आम्ही धक्क्यात आहोत. याबद्दल कोर्टात केस सुरु आहे. यानंतर जर मला अशाप्रकारे धमकी मिळत असेल तर कुठेतरी कुटुंबाची सुरक्षितता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मी याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. मी आशा व्यक्त करतो की याबद्दल पोलीस लवकरात लवकर कारवाई करतील”, असेही झिशान सिद्दीकींनी सांगितले.