पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत पडून मृत्यू, पाणी पुरवठा मंत्र्यांनी दिली ''ही''  माहिती
पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत पडून मृत्यू, पाणी पुरवठा मंत्र्यांनी दिली ''ही'' माहिती
img
दैनिक भ्रमर
राज्यात सध्या पाणीटंचाई चा प्रश्नऐरणीवर असून या पाणीटंचाई मुळे लोकांची दयनीय अवस्था झाली असून अनेक जणांचा बळी  या पाणीटंचाई मुळे  गेलेला आहे. अशीच एक दुर्दैवी घटना काठोडा येथे घडली आहे. काठोडा येथील काही महिलांसह नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका चौदा वर्षीय मुलीचा नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेने  घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

या घटनेने मोदी सरकारच्या 'हर घर जल' योजनेची चिरफाड केली आहे. एरवी बाष्कळ मुद्द्यांवर दिवसेंदिवस काथ्याकूट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी मुलभूत मुद्द्यांवर संवेदनशील होण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.काठोडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी जमातीचे नागरिक राहतात. येथील रहिवाशांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे इथल्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

या सगळ्या प्रकरणावर बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पारधी बेडा हे ४७ घरांचे आणि १५२ लोकवस्तीचे छोटे गाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावात हँडपंप आणि सौरपंपाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सौरपंपाचे एक पॅनल खराब असल्याने आणि हँडपंप पुरेसे पाणी देत नसल्याने गावात पाणीटंचाई जाणवत आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे गाव एका मोठ्या ग्रामपंचायतीचा भाग असून, तिथे ४३ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे आणि जवळपास ६० ते ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.काही लोकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगी डोहाकडे कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र, ही माहिती अधिकृत मानली नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीमध्ये जर कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा यंत्रणेची निष्काळजीपणा आढळल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाला दिल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group