गॅसदरवाढीचा भडका ! गृहिणींचे बजेट कोलमडले...
गॅसदरवाढीचा भडका ! गृहिणींचे बजेट कोलमडले...
img
दैनिक भ्रमर
दोनतीन महिन्यांनी होतेय दरवाढ, महिला कमालीच्या हैराण

नांदगाव , अशोक बिदर : महाराष्ट्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने नागरिकांना महागाईची झळ बसत आहे. दर दोन-तीन महिन्यांच्या अंतराने गॅसदरवाढ होत असल्यामुळे महिला कमालीच्या हैराण झाल्या आहेत.

मागील १४ महिन्यांत घरगुती वापराच्या गॅसदरात पाच वेळा वाढ करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून घरगुती गॅस पुन्हा ५० रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर ३५० रुपयांनी वाढला आहे. एकंदरीत ही दरवाढ महिला व व्यावसायिकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे. दोन-तीन महिन्यांनी गॅससिलिंडर दरात वाढ होत असल्यामुळे महिलांचे आर्थिक गणित बिघडले आहे. केवळ घरगुतीच नाहीतर व्यावसायिक गॅससिलिंडरच्या दरातही वाढ झाल्यामुळे दरवाढीचे चटके व्यावसायिकांना बसत आहेत. २ फेब्रुवारी २०२३ अखेर व्यावसायिकांना एका सिलिंडरसाठी १८२९ रुपये मोजावे लागत होते. आता व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३५० रुपये इतकी वाढ झाल्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

धूरमुक्त चुलीचे स्वप्न हवेतच विरले...

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. मात्र या योजना कितपत तळागाळापर्यंत पोहोचतात याचा विचार सरकारने करायला हवा. सरकारचे धूरमुक्त चुलीचे स्वप्न असताना दरवाढ करणे कितपत योग्य आहे, असा सवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

१ ) सरकारने घरगुती गॅसदरवाढ करून महिलांना मोठा धक्का दिला. आधीच मेटाकुटीला आलेल्या महिलांना संसाराचा गाडा हाकणे जिकिरीचे झाले आहे. गॅरासिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

- रेखा कोरपे, गृहिणी,मनमाड

२ ) महिलांना संसाराचा गाडा चालविताना दररोज तारेवरची कसरत करावी लागते. त्यात आत्ताच गॅसदवाढ केल्यामुळे सर्वसामान्य महिला मेटाकुटीला आल्या आहेत. त्यामुळे सरकारने ही गॅसदरवाढ तत्काळ रद्द करावी.

- स्वाती प्रशांत उबंरे, गृहिणी, पानेवाडी

३ ) एकीकडे महिलांसाठी विविध योजना सुरू करून सरकार महिलांना विविध क्षेत्रांत सक्षम बनविण्याचे स्वप्न दाखवत आहे, तर दुसरीकडे गॅसदरवाढ करून महिलांना आर्थिक संकटात टाकत आहे. त्यामुळे ही गॅसदरवाढ शासनाने तत्काळ रद्द करावी.

- प्रतिभा लोखंडे, गृहिणी, नांदगाव
इतर बातम्या
Join Whatsapp Group