पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कावरील वाढी बद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने इंधनाच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. मागील दिवसांच्या तुलनेत आज कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. या आधारावर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. तथापि, राष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये बराच काळ बदल झालेला नाही आणि भविष्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही कपात होण्याची शक्यता नाही.
सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ करणार असल्याची अधिसूचना जारी केली आहे. पण, सरकारने जरी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली तरी, सामान्यांच्या खिशावर या वाढीचा काही परिणाम होणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढीव उत्पादन शुल्काचा भार तेल कंपन्यांना सोसावा लागेल असेही सांगितले जात आहे.
या संदर्भात अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता प्रति लिटर १३ रूपये झाल्याचा उल्लेख केला आहे. तर, डिझेलवरील हे शुल्क प्रति लिटर १० रूपये झाल्याचा उल्लेख केला आहे. पण, या वाढवलेल्या शुल्काचा किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल हे आदेशात नमूद केलेले नाही. नवीन दर ८ एप्रिलपासून लागू होतील. गेल्या वर्षी १४ मार्च रोजी, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची कपात केली होती.