गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ हो चालली आहे. हल्ली पती पत्नीच्या वादातून अनेक गंभीर घटना घडल्याचे उघडकी येत आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मुस्कानने पतीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बिजनौरमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली. याठिकाणी बायकोने नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. रेल्वे कर्मचारी असलेल्या दीपकच्या बायकोने त्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त होत हत्या केली. या घटनेमुळे बिजनौरमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय दीपक कुमार रेल्वे कर्मचारी म्हणून काम करत होते. दीपक त्यांची बायको शिवानीवर खूप संशय घ्यायचे. याच कारणामुळे त्यांची इच्छा होती की बायकोने आणि मुलांनी गावामध्ये आई-वडिलांजवळ राहावे. पण दीपकच्या बायकोला शहरामध्ये राहायचे होते आणि याच कारणावरून दोघांमध्ये प्रचंड वाद होत होता.
आपली मुलं आणि नवऱ्यासोबत शहरामध्ये राहण्याची शिवानीची इच्छा होती. ती वारंवार दीपक यांच्याकडे याबाबत हट्ट करायची. अशात दीपक तिच्यावर वारंवर संशय घ्यायचे. तिचे बाहेर कोणासोबत तरी अफेअर सुरू असल्याचे त्यांना वाटायचे. याच कारणावरून दीपक यांनी शिवानीला मारहाण केली होती. याचाच राग मनात ठेवून शिवानीने दीपक यांचा हत्या करण्याचा प्लान आखला. पोलिसांनी सांगितले की, १५ दिवसांपूर्वी नजीदाबादमध्ये कुटुंबासोबत राहायला आलेल्या शिवानीने दीपक यांची हत्या केली.
दीपक यांना तिने मखाने खायला दिले. या मखान्यामध्ये तिने झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या. जेव्हा दीपक यांना गुंगी आली तेव्हा शिवानीने गळा दाबून त्यांची हत्या केली. शिवानीचा उजवा हात आधीपासूनच फॅक्चर होता. अशामध्ये तिने दीपक यांची गळा दाबून हत्या करण्यासाठी डावा हात वापरला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली.
सध्या शिवानीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून क्राइम सीन देखील रिक्रिएट केला होता. पोलिसांच्या हाती एक व्हिडिओ देखील लागला आहे ज्यामध्ये शिवानी आणि तिचा नवरा दीपक भांडण करताना दिसत आहेत. तेव्हा त्यांचा मुलगा वेदांत रडत असल्याचा आवाज येत आहे. नवऱ्याची हत्या केल्यानंतर शिवानीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आधी हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण पोस्टमॉर्टममध्ये दीपकचा मृत्यू गळा आवळून हत्या केल्यामुळे झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये रेल्वे कर्मचारी दीपक यांनी शिवानीसोबत लव्ह मॅरेज केले होते. सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर शिवानीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती दीपक यांच्या मागे लागली आणि शेवटी दीपक आणि शिवानी भाड्याच्या घरात राहू लागले. याठिकाणीच शुक्रवारी दुपारी शिवानीने दीपकची हत्या केली.