
८ एप्रिल २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून त्याद्वारे अधिक आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी 33 वर्षीय इसमाला 76 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 22 ऑक्टोबर 2024 पासून दि. 20 मार्च 2025 पर्यंत आरोपी फेसबुकवरील अनन्या शुक्ला या नावाने व्हॉट्सअॅप क्रमांकावरून बोलणार्या व चॅटिंग करणार्या इसमाने 33 वर्षीय फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. या व्यक्तीने क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे सांगून फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठविली. टॉप कस्टमर सर्व्हिस सेंटरच्या नावे असलेल्या व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावरून या व्हॉट्सअॅप सिंगल युजर ग्रुप तयार करण्यात आला.
त्या ग्रुपचा वापर करून त्याद्वारे फिर्यादीस क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करून त्याद्वारे अधिक आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर सायबर आरोपींनी फिर्यादीस विविध बँक खात्यावर रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार फिर्यादीने विविध बँक खात्यांवर एकूण 75 लाख 95 हजार 60 रुपये इंटरनेट व फोनद्वारे ऑनलाईनच्या माध्यमातून जमा केले. त्यानंतर बरेच दिवस होऊनही गुंतविलेल्या रकमेवर अधिक नफा मिळत नसल्याची बाब लक्षात आली.
सायबर भामट्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक ढवळे करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar