
८ एप्रिल २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने दोन हजार रुपये घेऊन पुन्हा पैशांची मागणी केली असता ते दिले नाहीत म्हणून दुचाकी जाळून नुकसान केल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कार्तिक सुनील मोहिते (रा. जेआयटी कॉलेजसमोर, नाशिक) व त्याचा मित्र शुभम् मोहन तुपलोंढे (रा. गंगापूर गाव) हे दोघे जण एमएच 15 जेएन 3483 या क्रमांकाच्या मोटारसायकलीने जात होते. त्यावेळी आरोपी राहुल जाधव (रा. ध्रुवनगर, नाशिक), महेश शिंदे (रा. निगळ पार्क, सातपूर), अरबाज शेख (रा. शिवाजीनगर, सातपूर) व त्यांचा एक अनोळखी साथीदार अशा चौघांनी मिळून फिर्यादी मोहिते यांना ध्रुवनगर येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर अडवून कोयत्याचा धाक दाखवून धमकावून, तसेच मारहाण करून बळजबरीने फिर्यादीकडे पैशाची मागणी केली.
तसेच फिर्यादीच्या मोबाईलवरून फोनपेद्वारे दोन हजार रुपये ऑनलाईन घेतले; मात्र आरोपींनी पुन्हा पैशांची मागणी केली असता मोहिते याने पैसे देण्यास नकार देऊन तेथून पळून गेला. याचा राग आल्याने चौघा टवाळखोरांनी फिर्यादीच्या मोटारसायकलीला आग लावून ती पेटवून देत जाळून नुकसान केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
Copyright ©2025 Bhramar