एक कोटी रुपयांसाठी बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या चौघांना अटक
एक कोटी रुपयांसाठी बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या चौघांना अटक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण करीत खंडणी मागणार्‍या दोन जणांना व त्यांना माहिती पुरवणाऱ्या दोघांना अशा 4 जणांना गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

महंमद अन्वर सय्यद (वय 30, रा. नानावली, नाशिक) व सादिक लतीफ सय्यद (वय 39, रा. लेखानगर, नाशिक) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, की दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास काठे गल्ली सिग्नल येथून निखिल दर्यानानी या व्यावसायिकाचे तीन अनोळखी इसमांनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवीत त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

त्यापैकी 15 लाख रुपये दिल्यानंतर त्यांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिले होते. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-1 च्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चार दिवस अहोरात्र परिश्रम घेत तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे त्यांनी आरोपींची नावे निष्पन्न केली. आरोपींच्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या घरी संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरात शोध घेण्यासाठी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे गेले होते.

त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत समजले, की आरोपी नाशिक येथे आले असून, ते विल्होळी भागात आहेत. ही बातमी त्वरित पालखेडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विल्होळी भागात सापळा रचून वरील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 2 लाख 88 हजार रुपये रोख व मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

त्यांची अधिक चौकशी केली असता आरोपींनी सांगितले, की निखिल दर्यानानी यांच्या भावाच्या दुकानात काम करणारे अल्फरान शेख व अहमद शेख यांनी निखिल दर्यानानीबाबत माहिती पुरविली. त्यानंतर त्यांनी निखिल यांचे अपहरण करून त्यांना जिवंत सोडण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांच्याकडून 15 लाख रुपयांची खंडणी घेतल्याची कबुली दिली.

पोलिसांनी नंतर माहिती पुरविणार्‍या अल्फरान अश्पाक शेख (वय 25, रा. चौक मंडई, भद्रकाली, नाशिक) व अहमद रहिम शेख (वय 25, रा. वडाळा गाव, नाशिक) यांना वडाळा गावातून ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मुंबई नाका पोलिसांच्या हवाली केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group