CDSCO कडून   ''या'' 35 औषधांचे उत्पादन, विक्री अन् वितरण तातडीने थांबवाण्याचे आदेश
CDSCO कडून ''या'' 35 औषधांचे उत्पादन, विक्री अन् वितरण तातडीने थांबवाण्याचे आदेश
img
दैनिक भ्रमर
औषधांविषयीची एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. CDSCO कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.देशातील सर्वोच्च आरोग्य नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) एक तातडीचा आदेश जारी केला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 35 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन ड्रग्ज आणि इतर कोणत्याही परवानगी नसलेल्या औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण थांबवण्यास सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या औषधांच्या यादीमध्ये वेदनाशामक, मधुमेहविरोधी औषधे, उच्च रक्तदाबविरोधी औषधे, न्यूरोपॅथिक वेदना कमी करणारी औषधे, प्रजननक्षमतेसंबंधी औषधे यांचा समावेश आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अशा एफडीसींसाठी त्यांच्या मंजुरी प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करण्यास आणि औषधांना मान्यता देताना काटेकोरपणे पालन करण्यास सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून सांगण्यात आले. फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDCS) हे असे औषधे आहे, जे एकाच गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधांची मात्रा देते. त्यास "कॉकटेल" औषध देखील म्हटले जाते.

सीडीएससीओचे प्रमुख असलेल्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना "अस्वीकृत एफडीसी" च्या उत्पादन आणि विपणनाबाबत एक पत्र लिहिले. तसेच, सीडीएससीओच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या पुनरावलोकनाशिवाय राज्य अधिकाऱ्यांनी यापूर्वी परवाना दिलेल्या 35 अस्वीकृत एफडीसींची यादी देखील दिली.

चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश डीसीजीआयने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील औषध नियामकांना चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करण्यास देखील सांगितले. डीसीजीआय राजीव सिंह रघुवंशी यांनी इशारा दिला की, “यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असून तातडीने कारवाई करण्यात यावी.''

पत्रात काय म्हटले आहे? 

काही एफडीसी औषधे योग्य सुरक्षा आणि तपासणीशिवाय मंजूर करण्यात आल्याचे सीडीएससीओला आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 अंतर्गत एनडीसीटी नियम 2019 च्या तरतुदीनुसार सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन न करता काही औषधांना उत्पादन, विक्री आणि वितरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group