स्वारगेट बसस्थानकात फलटणाला जाण्यासाठी आलेल्या तरुणीवर दत्ता गाडे या नराधमाने बलात्कार केला होता. गजबजलेल्या बसस्थानकात हा प्रकार घडल्याने राज्यातच नाही तर देशात खळबळ उडाली होती.
दरम्यान , या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधात ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ५२ दिवसांमध्ये हा तपास आता पूर्ण केला आहे. फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. ज्यावेळी पिडीता फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी दत्ता गाडेने तिला फसवून बसमध्ये नेलं. आरोपी गाडेने पिडीतेला जबरदस्तीने सीटवर ढकललं. पिडीता वाचवा म्हणत जोरात ओरडली, पण बसचे दरवाजे बंद असल्याने आवाज बाहेर गेला नाही. आरोपी गाडेने तिचं तोंड दाबून जबरदस्ती पिडीतेवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
या आरोपीची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपी गाडे आणि पिडीता यांच्या डीएनए तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. पिडीतेने झालेल्या घटनेची माहिती कंडक्टर आणि ड्रायवरला दिली होती. शिवशाही बसमध्ये ओरडल्याचा आवाज बाहेर येत नसल्याचं साउंड इंजिनिअर यांनी स्पष्ट केलं आहे. तर धक्कादायक म्हणजे आरोपीच्या जीमेलची गुगल सर्च हिस्ट्री तपासण्यात आली ज्यात आरोपी वारंवार पोर्न व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालं आहे.