आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून चोरी, दरोडा अशा घटना दरदिवशी घडत आहेत. दरम्यान, अशीच एक दरोड्याची बातमी आता समोर आली आहे. विशेष म्हणजे या दरोड्यातील दरोडेखोरांचा छडा एका श्वानाने लावला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एका श्वानाने १० दरोडेखोरांचा पर्दाफाश केला आहे. आठ ते दहा दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती. यावेळी आरोपींनी घरातील साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. अपरात्री आलेल्या चोरट्यांनी हा कांड केल्याने पोलिसांकडे कसलाही पुरावा नव्हता. मात्र एका श्वानामुळे दरोड्याचा छडा लावणं पोलिसांना सोपं गेलं आहे.
याप्रकरणी वाळूज पोलिसांनी सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित श्वानाने सात ते आठ किलोमीटर अंतर कापून दरोडेखोरांचा छडा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील टोकी शेत शिवार वस्तीवर राहणाऱ्या भीमराव शेजवळ आणि कारभारी शेजवळ या शेतकऱ्यांच्या घरावर आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत धुमाकूळ घातला होता.
दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबीयांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 5 लाख 47 हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा तपास करीत असताना श्वान पथकाच्या सरस मदतीने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
डॉग अॅडमिन टिपूने घटनास्थळापासून तब्बल सात ते आठ किलोमीटर अंतर कापून आरोपी यांचे सिंधी सिरसगाव गाठून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधला. यानंतर पोलीस प्रशासनाने दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना जेरबंद केले. सातही आरोपी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.