आजकाल महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांची छेड, महिलांसोबत गैरवर्तन अशा घटना सर्रास पाने घडत आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. इंडिगोच्या दिल्ली-शिर्डी विमानामध्ये एका प्रवाशाने नशेत एअर हॉस्टेस सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आज (4 मे) दिवशी या घटनेची माहिती दिली आहे. ही घटना 2 मे शुक्रवार दुपारची आहे. विमान शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवाशाने विमानाच्या शौचालयाजवळ एअर होस्टेसला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या अश्लील कृत्यामुळे संतप्त झालेल्या एअर होस्टेसने तिच्या क्रू मॅनेजरला घडल्या प्रकाराची माहिती दिली. शिर्डी विमानतळावर विमान उतरल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रवाशाला राहाता पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यपान केल्याचे सिद्ध झाले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला राहाता पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आरोपी व्यक्तीचे नाव संदीप सुमेर सिंग असे आहे. तो राजस्थानमधील चुरू येथील सरकारी कर्मचारी आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.