मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज अन त्रासदायक कॉल करणाऱ्याला अटक, काय आहे प्रकरण ?
मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज अन त्रासदायक कॉल करणाऱ्याला अटक, काय आहे प्रकरण ?
img
दैनिक भ्रमर
गेल्या अनेक  दिवसांपासून राजकारणी आणि अनेक दिग्दज लोकांना असे फेक कॉल आणि  कॉल मार्फत धमक्या तसेच मसेजेस  अनेक प्रकार घडले आहेत. दरम्यान,  गेल्या काही दिवसांआधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना एका अज्ञाताकडून अश्लील मेसेजेस आणि कॉल येत होते. या प्रकरणाचा छडा लागला  आहे.  पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवणे आणि त्रासदायक कॉल करणे या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमोल काळे (वय 25) असे आरोपीचे नाव असून अश्लील फोन कॉल करणे आणि अनुचित संदेश पाठवणे या आरोपाखाली सायबर पोलिसांनी काळे याला अटक केली. नोडल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निखिल भामरे (26) यांनी तक्रार दाखल केली होती. भामरे हे मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात. आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह एफआयआर नोंदवला.

आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता, तो ट्रेस करत पोलिसांनी संशयिताचे स्थान अर्थात लोकेशन शोधून काढलं. ते पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोल काळे (25) या आरोपीला ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काळे याने आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचे कबूल केले. त्यानंतर, अमोल काळे याला बीएनएनएस कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली, मुंबईत आणण्यात आले आणि औपचारिकरित्या अटक करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी आहे . त्याने अश्लील भाषा का वापरली, तसेच छळ करण्याच्या वर्तनामागील त्याचा हेतू काय याचा तपास सध्या करण्यात येत आहे, असे नोडल सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याला जरी पुण्यातील भोसरी येथे अटक करण्यात आली असली तरी काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील असे समजते. पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group