नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : माजी नगरसेवक सुनिल गोडसे यांच्या घरात भरदिवसा झालेल्या घरफोडीप्रकरणी उपनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट-२ यांच्या संयुक्त कारवाईत सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून ८ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव लखनसिंग दुधानी (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) असे आहे.
१८ फेब्रुवारी रोजी दुपार च्या सुमारास वाजता गोडसे यांच्या घरावर कुलूप लावून ते बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी,संदीप मिटके यांनी सतत तपासावर लक्ष ठेवले.
गुन्हे शाखा युनिट-२ आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे लखनसिंग दुधानी आणि त्याच्या साथीदाराची माहिती मिळवली. सपोनि हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे आणि त्यांच्या पथकाने पुण्यातून आरोपीस ताब्यात घेतले व उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने रविसिंग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्या मदतीने चोरी केल्याचे उघड झाले आहे. मात्र, सर्व चोरीचा मुद्देमाल लगेच हस्तगत झाला नव्हता. परंतु तपास पथकाने कौशल्याने कारवाई करत एकूण ८ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच, या आरोपींविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ४० ते ४५ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच विश्रांतवाडी पोलीस ठाणे, पुणे येथेही त्यांच्याविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, तपासी अधिकारी पोउनि प्रभाकर सोनवणे तसेच गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी झाली आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि प्रभाकर सोनवणे करीत आहेत.