यवतमाळ जिल्ह्यातून एक हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे. एका वडिलांना आपल्या मुलीचा यशाचा आनंद साजरा करत असतानाच मृत्यूने गाठलं असलायची ही दुःखदायक घटना आहे. मुलगी आयएएस (IAS) अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्यूमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे ही घटना घडली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की , प्रल्हाद खंदारे यांची कन्या मोहिनी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण खंदारे कुटुंबाने गावात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, कार्यक्रमादरम्यानच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी महागाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करायचा असताना तिच्या वडिलांच्या निधनामुळे सगळं वातावरण गहिवरून गेलं. प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि नव्याने आयएएस झालेली मुलगी असा परिवार आहे.