जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून आता देशातील सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. दरम्यान, आता सुरक्षेच्या दृष्टीने लॉजवर राहण्याचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत.
दरम्यान पुणे पोलिसांनी पुण्यातील लॉज मालक आणि चालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लॉजमध्ये रुम देण्यापूर्वी लॉज चालकांनी ग्राहकांची शाहनिशा करूनच रुम द्यावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी लॉज चालक आणि मालकांना दिल्या आहेत. यामुळे आता पुण्यात लॉजवर राहणं काही प्रमाणात कठीण होणार आहे. ग्राहकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच ते लॉजमध्ये राहू शकतात.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी पुण्यातील लॉज मालक आणि चालकांना या सूचना दिल्या आहेत. लॉजवर राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टर मध्ये नोंद करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि लॉज मालक- चालक हजर होते. पुणे पोलिसांच्या परिमंडळ ५ कडून हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पोलिसांनी लॉज मालक चालकांसोबत चर्चा केली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
लॉजमध्ये परदेशी नागरिक राहण्यास आला असेल, तर त्याच्याकडून सी फॉर्म भरून घ्यावा, तसेच त्याचे पासपोर्ट आणि व्हिजाची छायांकित प्रत घेऊन रजिस्टरमध्ये नोंद करावी. तसेच लॉजच्या प्रवेशद्वारावर आणि सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील, अशा पद्धतीने एचडी आणि नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्यात यावेत, अशा सूचना देखील पोलिसांनी दिल्या. लॉजमध्ये संशयित इसम आढळून आल्यास तत्काळ पोलीस कंट्रोल रुमला माहिती द्यावी, असं पोलिसांनी सांगितलं आहे.