विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं  निधन
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन
img
दैनिक भ्रमर
विधान परिषदेचे माजी आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज पहाटे त्यांचे प्राणज्योत मालवली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

राजकारण, समाजकारण आणि क्रीडाक्षेत्रात आपला ठसा उमटवणारे अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहराचं महत्त्वाचं नेतृत्व होतं.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. अरुणकाका जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्ष, तसेच सलग दोनवेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलं आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. ते अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य होते. शिक्षण क्षेत्रातही योगदान देताना गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. नगर शहरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे अरुणकाका जगताप यांचे सुपुत्र आहेत. 

दरम्यान,  अरुणकाका जगताप  यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अरुण काकांच्या निधनामुळे एक अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group