राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता राज्य शासनाच्या एका महत्वपूर्ण मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकरकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात असून आता महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याची महत्वपूर्ण मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे.
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली असून, ती मागणी तात्काळ मान्य करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीदरम्यान हा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला. या बैठकीत शैक्षणिक सुधारणांसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या व प्रस्ताव मांडण्यात आले, ज्यांना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीदरम्यान स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशव्यापी शैक्षणिक अभ्यासक्रमात अधिक व्यापक स्वरूपात समाविष्ट करण्याची महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली. ही मागणी तात्काळ मान्य करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित सचिवांना केंद्रीय पाठ्यपुस्तक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) पाठ्यपुस्तकांमध्ये याचा समावेश करण्याचे निर्देश दिले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे,” असे दादाजी भुसे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांना महाराष्ट्र सदन येथे ही माहिती दिली.
यासोबत, मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, मराठी भाषेचा राष्ट्रीय शैक्षणिक पातळीवर उचित समावेश होण्याबद्दलची मागणी केली. या मागणीला प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.