राज्यात अतिमुसळधार !  वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार, IMDचा  अलर्ट
राज्यात अतिमुसळधार ! वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार, IMDचा अलर्ट
img
दैनिक भ्रमर
राज्यातील हवामानात अनेक कमालीचे बदल होत असून  राज्यातील काही भागात गेल्या तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा पारा तर काही भागात पाऊस असल्याने सर्वत्र दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.8 मे रोजी सुद्धा राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांना 8 मे साठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरी पडू शकतात. शेतकरी आणि नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईत, 8 मे रोजी संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके असू शकते. त्याचबरोबर पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुण्यात 8 मे रोजी दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची चिन्हे आहेत. संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्या ठिकाणचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस इतके असू शकते. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुपारनंतर ढग जमा होण्यास सुरुवात होऊन संध्याकाळनंतर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

नाशिकमध्ये देखील 8 मे रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्या ठिकाणी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 8 मे रोजी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये दुपार किंवा सायंकाळनंतर सामान्यतः ढगाळ वातावरण निर्माण होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group