पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील तणाव वाढला आहे. पहलगाम येथील हल्ल्यांनंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून या घटनेननंतर भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे.
भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात व पारगमनावर तात्काळ बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालक व अतिरिक्त सचिव अजय भादू यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. यामुळे दुबईकडे होणाऱ्या कांदा निर्यातीवर सकारात्मक परिणाम होणार असून, आता भारतीय कांद्याचे कंटेनर थेट दुबईला रवाना होतील, कराचीमार्गे जाण्याची गरज राहणार नाही.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परकीय व्यापार महासंचालनालयाच्या फॉरेन ट्रेड विभागाने ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या निर्णयाचे व्यापक परिणाम व्यापारी व्यवहारांवर दिसून येतील. अधिसूचनेनुसार, पाकिस्तानातून उत्पन्न झालेल्या किंवा तिकडून पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची भारतामध्ये आयात किंवा पारगमन (ट्रान्झिट) पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लावणे आवश्यक होते. या निर्णयामुळे पाकिस्तानमार्गे होणाऱ्या कोणत्याही व्यापारावर निर्बंध येणार असून, भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणातही एक ठळक पाऊल उचलले गेले आहे.
या निर्णयामुळे कांद्याच्या स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय बाजारावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे नाशिकमधील कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले. त्यांच्यानुसार, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात कांद्याच्या व्यापाराचे संबंध पूर्वीपासूनच बंद आहेत. त्यामुळे भारतात पाकिस्तानहून कांदा येत नाही आणि आपल्याकडून तिकडे निर्यातही होत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर या बंदीचा फारसा परिणाम जाणवणार नाही.”
सध्या भारतातून दुबईकडे जाणाऱ्या सुमारे 30 ते 40 टक्के कांदा कंटेनर हे कराचीमार्गे (Pakistan's Karachi Port) पाठवले जात होते. पण या नवीन निर्णयानुसार हे सर्व कंटेनर थेट दुबईला पाठवले जातील, त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी होतील आणि निर्यात प्रक्रियाही अधिक जलद व सुरक्षित होईल.
स्थानिक कांदा बाजारपेठेवर परिणाम नाही नाशिकसारख्या कांदा उत्पादन केंद्रांमध्ये बाजारपेठ सध्या स्थिर आहे. व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, पाकिस्तानशी कोणताही प्रत्यक्ष कांदा व्यवहार नसल्यामुळे दरवाढ किंवा दरकपात यासारखी कोणतीही स्थिती उद्भवणार नाही. परिणामी शेतकरी आणि व्यापारी दोघेही या निर्णयामुळे आश्वस्त आहेत.
हा निर्णय भारताच्या व्यापार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, त्याच्या अंमलबजावणीमुळे भविष्यात भारताचे शेजारी देशांबरोबरचे संबंध, विशेषतः पाकिस्तानसोबतचे, नव्या अंगाने ठरतील.