जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या घटनेनं संपूर्ण देश हादरला असून संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळत आहे. या घटनेनंतर आता भारताने अनेक महत्वाचे निर्णय घटले असून केंद्र सरकार आता एक्शन मोड मध्ये आले आहे. भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. दरम्यान, आता भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना उद्या बुधवारी (दि. 07) विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
गृह मंत्रालयात झालेल्या एका आढावा बैठकीत देशभरातील 244 जिल्हा नागरी संरक्षण केंद्रांची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये निवारा केंद्रे, इशारा देणारी यंत्रणा आणि समन्वय सुविधा कार्यरत आहेत की दुरुस्तीची गरज आहे, याचे मूल्यमापन करण्यात आले. या ड्रिलचा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे हे ठरणार आहे.
गृह मंत्रालयाच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय किट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार?
प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये 100 हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्चिती केली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अनेक महत्त्वाच्या उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे, शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे, तसेच विद्यमान बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे.