रेशन कार्ड धारक ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्वस्त धान्य वाटपासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने आता 17 मेपर्यंत धान्य उचलण्यास मुदतवाढ दिली आहे.
मे महिन्यासाठीच्या रेशनवरील धान्याच्या उचल प्रक्रियेत विलंब झाल्याने अनेक जिल्ह्यांत धान्य वेळेत पोहोचू शकले नाही. परिणामी, नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने आता 17 मेपर्यंत धान्य उचलण्यास मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे राज्यातील रेशन दुकानदार व ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
राज्य शासनाने यापूर्वी निर्देश दिले होते की, पुढील महिन्याचे धान्य वाटपासाठी मागील महिन्याच्या अखेरीपर्यंत उचलले गेले पाहिजे. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यावर वेळेत धान्य उचलण्याचा तगादा होता. यासंदर्भात कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, भारतीय अन्न महामंडळाकडून वेळेवर धान्याचा पुरवठा न झाल्याने एप्रिलअखेरपर्यंत फक्त 6 हजार टन धान्य उचलता आले. दरमहा सुमारे 14 हजार टन धान्याची गरज असते. परिणामी उर्वरित 8 हजार टन धान्याच्या उचलात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रेशन ग्राहकांना मे महिन्याच्या सुरुवातीस धान्य मिळू शकले नाही.
दरम्यान, सरकारने जून महिन्याचेही 14 हजार टन धान्य 30 मेपर्यंत उचलण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जिल्ह्यातील सुमारे 50 टक्के रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोचले आहे आणि काही ठिकाणी वितरणास सुरुवातही झाली आहे. आता उर्वरित लाभार्थ्यांनाही वेळेत धान्य मिळण्याची अपेक्षा आहे.