सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाची हजेरी ; कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत...
सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाची हजेरी ; कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत...
img
दैनिक भ्रमर

मनमाड,  प्रतिनिधी : सलग दुसऱ्या दिवशी शहर परिसरात सायंकाळी अचानक वादळवारा आणि गारांसह बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांद्याचे डोंगळे, काढणीस आलेला कांदा आणि काढून पोळी मारून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याने बळीराजाचे डोळे अक्षरशा पाणावले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.मात्र वादळी वारे,बेमोसमी पाऊस अन् गारपिटीमुळे परिसरात या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान होऊन मोठी हानी झाली.या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी गारपिट,वादळी वारे व मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने परिसराला चांगलेच झोडपून काढले. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी लावलेल्या कडब्याच्या गंजी झाकलेल्या नसल्याने कडबा भिजून मोठे नुकसान झाले.

कांदा पिकासाठी लावले आणि काढलेले डोंगळें,शेतात कांद्याच्या पोळी आणि काही शेतकरी खरीप पेरणीपूर्वी मशागतीत व्यस्त असताना त्यांना अचानक कामे सोडावी लागली तर कामावर गेलेल्या महिलाची तारांबळ उडाली.ऊन देण्यासाठी अंगणात वाळू घातलेले डोंगळे,ज्वारी,गहू व बाजरी गोळा करताना अचानक आलेल्या पावसाने लोकांची भंबेरी उडाली.जोरदार वादळी वाऱ्याने शेतातील उन्हाळी मका,घाईघाईने झाकून ठेवले कांदा पोळी,चारा तर अनेक घरावरील पत्रे उडून गेली. एकंदरीत या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळच उडाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group