पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक तणाव वाढला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले यानंतर भारत - पाक तणाव अधिकच वाढला असून पाकिस्तानने सीमाभागातील काही शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने तो हाणून पाडला आहे. परंतु, वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. युद्धजन्य परस्थितीत पुणेकरांनी काय काळजी घ्यावी? याबाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
कोणत्याही अफवांना बळी न पडता सरकारी आणि अधिकृत माध्यमांवरून अधिकृत माहिती घ्यावी. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून त्यासाठी पुणेकरांनी प्रयत्न करावेत. भारतीय सैन्य आणि प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन करावे. टीव्ही, रेडिओ, मोबाईल अलर्ट्स किंवा स्थानिक प्रशासनाच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवावे.
सायरन वाजल्यानंतर अजिबात घाबरू नका. तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावं आणि मोकळ्या जागेपासून लांब राहावं. घर किंवा भक्कम इमारतीत आश्रय घ्या. टीव्ही, रेडिओ, सरकारच्या सूचनांवर लक्ष द्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. रात्रीच्या वेळी परिसरातील लाईट्स बंद ठेवा. घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा.
दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा साठा असावा. औषधे, पाणी, अन्न-धान्य, खाद्यपदार्थांचा किमान 7 दिवसांचा साठा करावा. इन्व्हर्टर, बॅटरीज चार्ज करा. टॉर्च, मेणबत्ती, माचिस जवळ बाळगा. कागदपत्रं सुरक्षित ठिकाणी ठेवा. प्रथमोपचार पेटी जवळ बाळगा. वाहनांमध्ये पुरेसं इंधन भरा आणि गरजेपुरते पैसे जवळ ठेवावेत.
दरम्यान, लष्करी किंवा पोलीस हालचालींबाबत फोटो किंवा माहिती शेअर करू नका. हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं. प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. शांतता, संयम आणि सजगता हीच खरी देशसेवा आहे.