भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने सोशल मीडियावर "पाकिस्तान झिंदाबाद" अशा आशयाची पोस्ट शेअर केल्यामुळे खळबळ उडाली.
या पोस्टमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तरुणीला अटक केली आहे. तसेच तिच्यावर कॉलेजनेही कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , ही कारवाई केल्यानंतर आरोपी तरुणीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी तिच्यावर गंभीर स्वरूपाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक बाब उघड झाली असून, अटक होण्यापूर्वी संबंधित तरुणीने श्रीनगरला जाऊन आपल्या नातेवाईकांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ती तेथे असताना देशविरोधी कारवाया करणाऱ्या यंत्रणांच्या संपर्कात आली होती का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
याप्रकरणी तरुणीचा मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तांत्रिक तपासणीसाठी जप्त करण्यात आली असून, तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील सर्व हालचालींची चौकशी केली जात आहे.
पोलीस प्रशासनाने यासंदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, देशविरोधी कोणतीही कृती अथवा सोशल मीडिया पोस्ट आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान न्यायालयाने या तरुणीला पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.