
आजकाल कोणावर विश्वास ठेवणे अतिशय कठीण झाले आहे. कारण आजच्या या युगात कोण कधी आपला काळ ठरेल हे सांगताच येत नाही, मग ते पोटचं मूल असो किंवा जन्मदाते आईवडील असो कधी कोणच्या मनात काय येईल हे सांगणे कठीणच आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका अनाथ मुलीला सहारा देऊन मोठं करण एका महिलेला जीवाशी भोवलं आहे .
समोर आलेल्या माहितीनुसार,ओडिशामध्ये एका महिलेने 13 वर्षांपूर्वी एका नवजात मुलीला दत्तक घेतले होते. 13 वर्षांपूर्वी राजलक्ष्मी आणि त्यांचे पती घरी जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांना एक नवजात मुलगी रडताना सापडली. तिचे रडणे पाहून त्या दांपत्याचे मन हेलावले आणि त्यांनी तिला दत्तक घेतले. ती मुलगी कोणाची आहे, याचा काहीच पत्ता लागला नाही. म्हणून दांपत्याने तिचे संगोपन सुरू केले. पण जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा तिने दोन पुरुषांच्या मदतीने आपली दत्तक आई राजलक्ष्मीची क्रूरपणे हत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या दोन पुरुष मित्रांसह मिळून 29 एप्रिल रोजी गजपति जिल्ह्यातील परलाखेमुंडी शहरात भाड्याच्या घरात आपली 54 वर्षीय आई राजलक्ष्मीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजलक्ष्मी आपल्या मुलीच्या दोन तरुणांशी असलेल्या संबंधांना विरोध करत होती. त्यामुळे संतापलेल्या मुलीने आईचा खून केला.
आरोपी मुलीने आधी रात्री फसवून राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. मग बेशुद्ध अवस्थेत त्यांचा उशीने गळा दाबला. त्यानंतर ती आपल्या आईला रुग्णालयात घेऊन गेली, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, भुवनेश्वरमध्ये त्यांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. कोणालाही काहीच कळले नाही.
दोन आठवड्यांनंतर, राजलक्ष्मी यांचे भाऊ सिबा प्रसाद मिश्रा यांना त्या मुलीचा मोबाइल फोन भुवनेश्वरमध्ये सापडला, जो तिथे राहिला होता. जेव्हा त्याची तपासणी केली गेली, तेव्हा इन्स्टाग्रामवरील त्या मुलीच्या तरुणांशी झालेल्या संभाषणात हत्येचा खुलासा झाला आणि संपूर्ण खुनाचा कट समोर आला. इन्स्टाग्रामच्या चॅटमध्ये त्या मुलीने तरुणांशी राजलक्ष्मी यांच्या हत्येची आणि त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हडपण्याची चर्चा केली होती. हे कळताच मिश्रा यांनी 14 मे रोजी परलाखेमुंडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हत्येत सहभागी असलेल्या तिघा आरोपींना, किशोरी मुलीला, मंदिराचे पुजारी गणेश रथ (21) आणि त्याचा मित्र दिनेश साहू (20) यांना अटक करण्यात आली. हे दोघेही त्या शहरातील रहिवासी आहेत.