भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच देशाला उद्देशून भाषण केले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले. तसेच पाकिस्तानने भारतातील मंदीर, शाळा, कॉलेज यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. भारताने मात्र पाकिस्तानच्या थेट छातीवर वार केला, असं मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानने भविष्यात अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर चोख प्रत्युत्तर दिलंय, असं मोदी यांनी ठणकावून सांगितलं.
पाकिस्तानने शाळा, गुरुद्वारा, मंदीर, घरांना लक्ष्य केलं
गेल्या अडीच ते तीन दशकांपासून पाकिस्तानात दहशतवादाचे आका खुलेआम फिरायचे. हे आका भारताविरोधात षड्यंत्र करायचे. याच आकांना भारताने एका झटक्यात समाप्त करून टाकलं. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेत गेला. पाकिस्तान हताश झाला होता. याच निराशेत पाकिस्तानने आणखी एक धाडस केलं. दहशतवादाला नष्ट करण्यासाठी भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताने भारतावरच हल्ला करणं चालू केलं. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदीर, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने आमच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचा बुरखा फाटला,असं नरेंद्र मोदी म्हणाले.
तीन दिवसांत पाकिस्तानला उद्धवस्त केलं
जगाने पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन्स, पाकिस्तानच्या मिसाईल्स अयशस्वी ठरल्या. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने या हल्ल्यांना आकाशातच नष्ट केलं. पाकिस्तानची तयारी ही सीमेवर हल्ला करण्याची होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला. भारताचे ड्रोन्स, भारताच्या मिसाईल्सने ठरवलेल्या लक्ष्यांवर बरोबर हल्ले केले. भारतीय लष्कराने पाकिस्ताच्या हवाई तळांना नेस्तनाबूत केलं. भारताने पहिल्या तीन दिवसांत पाकिस्तानला उद्धवस्त केलं. त्यामुळे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. पूर्णपणे मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने 10 मेच्या दुपारी पाकिस्तानी सेनाने आपल्या डीजीओमओंना संपर्क केला, अशी ही माहिती मोदी यांनी दिली.