राज्यात गुन्हेगारीचे आणि आत्महत्येचा प्रमाणात देखील चिंताजनक वाढ झाली आहे. दरदिवशी अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून आता एका बड्या नेत्याच्या सुनेने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या नेत्याच्या सूनेनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या सूनेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केला आहे. हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता. त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुळशी तालुक्यातील भुकूम (ता. मुळशी) येथे शुक्रवारी, 16 मे रोजी दुपारी साडे‑चारच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतल्याने मृत्यू झाला. वैष्णवी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र तुकाराम हगवणे यांची सून आहे. हुंड्यासाठी सतत होणाऱ्या मानसिक‑शारीरिक छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या मंडळीकडून करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला. काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी तो दरवाजा तोडला. त्यावेळी वैष्णवी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने घरच्या मंडळींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पतीसह सासरे, सासू, नणंद अटकेत
वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी हुंड्यासाठी छळ झाल्याची पोलीस तक्रार दिली. वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली. मारहाण व जाच करून तिच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले असल्याचे सांगितले. या तक्रारीनंतर वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती, सासू, नणंद यांना अटक केली आहे.