राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून आता मागील काही दिवसांपासून वाळू उपसा करण्याचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अनेक मंडल अधिकारी व तलाठ्यांवर गेल्या वर्षभरात अनेक जीवघेणे हल्ले झाले आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना समोर आली आहे. नुकतेच जालन्यात वाळू माफियांनी तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अंबड तालुक्यातील शहागड परिसरात सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूमाफियाकडुन थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चक्क हवेत गोळीबार करावा लागला आहे. तहसीलदार चव्हाण यांनी चार राऊंड फायर केले, त्यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाले. दरम्यान आरोपींचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात चार अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.