काही दिवसांपूर्वी जमुईमध्ये आयुषी कुमारीने तिचा पुतण्या सचिन दुबेशी लग्न केले होते. आता या प्रकरणात पती विशालने खुलासा केला आहे की त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
जमुईच्या सिकहरिया गावात काही दिवसांपूर्वी आयुषी कुमारी नावाच्या महिलेने आपला पहिला पती विशाल दुबे याच्या उपस्थितीत, पुतण्या सचिन दुबे याच्याशी मंदिरात लग्न केले होते. या प्रकरणात आता पीडित पती विशालने अनेक खुलासे केले आहेत.
विशाल दुबेने सांगितले की, आयुषी आणि सचिन यांनी त्याला धमकी दिली होती की जर त्याने त्यांच्या नात्यात अडथळा आणला तर त्याला जिवंत सोडणार नाहीत. विशालने दु:खी मनाने सांगितले, “लग्न लावले नसते तर मला ड्रममध्ये टाकून मारले असते. माझा जीव वाचवण्यासाठी मला त्यांना जाऊ द्यावे लागले.”
विशाल दुबेने सांगितले की, आयुषीच्या वागण्यात बदल जाणवत होता. त्याने फ्लिपकार्टमधील नोकरी सोडून गावी परत येऊन आयुषीवर लक्ष ठेवण्याचा आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण आयुषी ऐकली नाही. विशाल म्हणाला, “मी एक वर्ष समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकली नाही. सचिन आणि आयुषीने मला जिवे मारण्याची धमकी दिली.” विशालने पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती, पण समजावल्यानंतर आयुषीला घरी आणले. तरीही धमक्यांचा सिलसिला सुरूच राहिला.
विशालने सुरु केले नवे आयुष्य
विशालने सांगितले की, आयुषीच्या माहेरच्या मंडळींशी कोणताही संपर्क नाही. तो एकटेपणाच्या वेदना सहन करत आहे. आपल्या मुलीची आणि आजारी आईची काळजी घेत आहे. गावात आणि समाजात या घटनेबाबत नानाविध चर्चा होत आहेत. विशाल म्हणाला, “मी खूप समजावले की समाज काय म्हणेल, पण ती ऐकली नाही. आता मी माझ्या मुली आणि कुटुंबासाठी चहाची टपरी उघडून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे.”
काकी पुतण्याच्या प्रेमात कशी पडली?
पटना येथील राजीव नगर येथील रहिवासी असलेल्या आयुषीचे पहिले लग्न 2021 मध्ये विशाल दुबे याच्याशी झाले होते, ज्यापासून तिला चार वर्षांची एक मुलगी आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे आयुषीची गावातीलच सचिन दुबे याच्याशी भेट झाली, जो नात्यात तिचा पुतण्या लागतो. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि हे नाते प्रेमात बदलले. आयुषी आणि सचिन यांनी गुपचूप भेटी सुरू केल्या, याची कुटुंबियांना भनक नव्हती. 15 जून रोजी दोघांनी घर सोडले आणि परत आल्यावर गावातील मंदिरात लग्न केले.
आयुषीने विशालवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. तिने आपली मुलगी विशालच्या ताब्यात दिली आहे आणि कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.