देशातील विविध शहरांमध्ये छेडछाड, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. अशा शिक्षांमध्ये आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, ज्यामुळे कोणी असे गुन्हे करण्यास धजावणार नाहीत, अशी जनभावना असते. पण एका बलात्काराच्या घटनेत कोर्टाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चेन्नईच्या आण्णा विद्यापीठात 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली होती.
काय म्हणाले न्यायाधीश?
बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना न्यायाधिशांनी महत्वाचे विधान केले. आरोपीला किमान 30 वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्याच्यावर कोणतीही दया दाखवू नये, असे न्यायाधीश एम. राजलक्ष्मी म्हणाले. न्यायाधीश राजलक्ष्मी यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर २ जूनपर्यंत शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. ज्यामध्ये आज न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे. याप्रकरणात शिक्षा सुनावताना आरोपी ज्ञानशेखरनला आजीवन कारावासाची शिक्षा आणि 90 हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय.
महिला न्यायालयाने सुनावली शिक्षा
अणा विद्यापीठ कॅम्पस बलात्कारात विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळ प्रकरणात तामिळनाडूतील चेन्नई येथील महिला न्यायालयाने आरोपी ज्ञानशेखरनला बलात्कारासह 11 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. न्यायाधीश एम. राजलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत ही शिक्षा सुनावली. या प्रकरणातील आरोपपत्र 24 फेब्रुवारी रोजी विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केले. त्यांनी ग्रेटर चेन्नई पोलिसांकडून प्रकरण ताब्यात घेतले.
घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला बिर्याणी विकणारा आणि गुन्हेगारी कारवायांचा इतिहास असलेला गुन्हेगार ज्ञानशेखरन याला अटक केली. ही घटना 23 डिसेंबर 2024 रोजी घडली. पीडित मुलगी इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी होती आणि तिच्या पुरुष मित्रासह कॉलेज कॅम्पसमध्ये होती. ज्ञानशेखरनने त्यांना एक बनावट व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले. व्हिडीओ लोकांना शेअर केला तर तुला कॉलेजमधून काढून टाकले जाईल अशी धमकी दिली होती.
त्यानंतर त्याने मुलाला जबरदस्तीने तेथून निघून जाण्यास भाग पाडले आणि मुलीला कॅम्पसच्या एका निर्जन भागात घेऊन गेला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून मुलाची चौकशी सुरू आहे असे भासवून त्याने पीडितेला आणखी धमकावले. जेव्हा तिने त्याच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला तेव्हा ज्ञानशेखरनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि व्हिडिओ देखील बनवला.
विद्यार्थ्यांना धमकी दिली
आरोपीने विद्यार्थीनीचा फोन नंबर घेतला आणि तिला ब्लॅकमेल केले. जर ती पुन्हा भेटली नाही तर व्हिडिओ तिच्या वडिलांना आणि कॉलेज अधिकाऱ्यांना पाठवण्याची धमकी आरोपीने दिली. असे असताना मुलीने गप्प राहण्यास नकार देऊन पोलीस तक्रार करण्याचे धाडस दाखवले. तिच्या कुटुंबाच्या आणि कॉलेज प्रशासनाच्या मदतीने तिने दुसऱ्याच दिवशी कोट्टूरपुरम ऑल वुमन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ज्ञानशेखरनला अटक करण्यात आली.
खटल्यादरम्यान आरोपीच्या वकिलाने वैयक्तिक कारणांचा उल्लेख करून शिक्षेत सौम्यता आणण्याची विनंती केली होती. पण गुन्ह्याचे जघन्य स्वरूप आणि आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता सरकारी वकिलांनी शिक्षेवर तीव्र आक्षेप घेतला होता. न्यायाधीश राजलक्ष्मी यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर 2 जून रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला.
हा निर्णय पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले गेले. शैक्षणिक कॅम्पसमध्ये महिलांना लक्ष्य करणाऱ्या गुन्ह्यांविरुद्ध एक मजबूत संदेश या शिक्षेकडे पाहिले जात आहे.