वसई : नालासोपारामधील ४१ अनधिकृत इमारतींच्या घोटाळा प्रकरणी ईडीने १३ ठिकाणी छापे टाकले. या घोटाळा प्रकरणात वसई-विरार महापालिकेचे वादग्रस्त अधिकारी आणि नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले.

ईडीकडून रेड्डी यांच्या घरावर छापा मारत ८.६ कोटी रुपयांची रोकड आणि २३.२५ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मुंबई, वसई विरारसह हैदराबादमधील १३ ठिकाणी ईडीने छापे मारले आहेत. बुधवारी सुरु झालेली कारवाई गुरुवारी पूर्ण झाली.
नालासोपारा पूर्वे येथील अग्रवाल नगरी येथे ४१ अनधिकृत इमारतींचा घोटाळा समोर आला होता. या इमारती जमीनदोस्त केल्यानंतर ईडीने घोटाळ्याच्या चौकशीला सुरूवात केली. माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि अनिल गुप्ता तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हा घोटाळा केला होता. घोटाळ्यात वाय.एस. रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०२५ पासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
वसई-विरार नगररचना उपसंचालक आणि महापालिकेचे अधिकारी रेड्डी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. रेड्डी हे सुरूवातीला सिडकोमध्ये कार्यरत होते. वसई-विरार पालिका स्थापन झाल्यानंतर त्यांची महापालिकेत नियुक्ती करण्यात आली. २०१२ मध्ये पालिकेच्या उपसंचालकपदावर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली. २०१६ मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाला २५ लाख रुपयांची लाच देताना रेड्डी यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर मे २०१६ मध्ये या रेड्डी यांची चौकशी सुरु करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
नालासोपारा येथे ३० एकर क्षेत्रफळावर अनधिकृतपणे ४१ इमारती उभारल्याचे निष्पन्न झाले. त्या जागेवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि कचरा डेपो असणे अपेक्षित होते. आरोपींनी ही जागा बळावून तेथे बनावट कागदपत्रे तयार केली आणि अनधिकृत बांधकाम केले. सर्वसामान्यांना फसवून इमारतीतील फ्लॅट्सची विक्री केली.