जम्मू आणि काश्मिरच्या पहलगाममध्ये दहतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांत बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या बारामुल्लामध्ये जवानांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. बारामुल्लामध्ये ३ दहशतवाद्यांनी घुसखोरी करणाऱ्या प्रयत्न केला. यामधील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
जवानांनी या कारवाईत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावला. चिनार पोलिस-इंडियन आर्मी एक्स हँडलने एका पोस्टमध्ये या कारवाईची माहिती दिली. जवानांनी पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
इंडियन आर्मीने या पोस्टमध्ये लिहिले की, '२३ एप्रिल रोजी बारामुल्ला येथील ऊरी खोऱ्यामध्ये २ ते ३ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना रोखले आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला.
यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. घटनास्थळावरून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धजन्य साहित्य जप्त केले आहेत. घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर एका दिवसातच जवानांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांमध्ये नेव्ही अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढव्यात आली आहे.