धक्कादायक  : सुनेने केली सासूची निर्घृण हत्या ; कुठे घडली घटना?
धक्कादायक : सुनेने केली सासूची निर्घृण हत्या ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
जालना :   जालन्याच्या भोकरदन नाका परिसरातील  प्रियदर्शनी सोसायटीत  सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन घरात आलेल्या सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची भयंकर घटना  घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर सून फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मृत सविता शिंगारे यांच्या आकाश शिंगारे या मुलाचा सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतिक्षा या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. प्रेम विवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह जालन्यातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या प्रियदर्शनी सोसायटीत राहत होता. नोकरीनिमित्त तो लातूर या ठिकाणी असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या सासू- सुना सोबत राहत होत्या.

मंगळवारी रात्री प्रतीक्षाने सासू सविता शिंगारे यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला. हत्येनंतर तिने त्यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला. मात्र गोणीमधून मृतदेह बाहेर नेता येत नसल्याने तो तसाच टाकून ती फरार झाली. सकाळी घराच्या मालकाला संशय येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली अन् जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी घर उघडून पाहताच सविता शिंगारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हादरुन गेले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येनंतर सून प्रतीक्षा शिंगारे फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 

दरम्यान, सूनेने आपल्या सासूला इतक्या निर्घृणपणे का संपवले? या हत्येत आणखी कोणाचा सहभाग होता का? असे अनेक सवाल उपस्थित होत असून यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group