जळगाव : 4 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय 48) भूकरमापक, भूमी अभिलेख कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 4/3/2025 रोजी तक्रार दिली की, तक्रारदार व त्यांचे काका यांची मस्कावद, ता. रावेर येथे सामाईक शेत जमिन असून त्यासाठी त्यांनी भुमी अभिलेख कार्यालय येथे दिनांक 7/1/2025 रोजी अर्ज करुन शासकिय फी भरली होती. त्यानंतर यातील आरोपी कुलकर्णी यांनी दि.18/2/2025 रोजी प्रत्यक्ष शेतात येवून जमिनीचे मोजमाप केले होते. त्यावेळी कुलकर्णी यांनी तक्रारदार यांना केलेल्या मोजमापच्या खुणा दाखविण्यासाठी 5500 रुपयाची मागणी स्वतःसाठी केली होती.
तेव्हा तक्रारदार यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर कुलकर्णी यांनी शेतात चण्याचे (हरभरे) पिक आहे पैशांच्या बदल्यात चणे दे असे सांगितले होते. तक्रारदार यांना पैसे अगर चणे (हरभरे) देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. 4/3/2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली. त्या अनुषंगाने तक्रारीची दि.4/3/2025 व दिनांक 25/3/2025 रोजी लाचमागणी पडताळणी मध्ये कुलकर्णी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतीच्या मोजमाप केलेल्या कामाचे खुणा दर्शवून सीमा निश्चिती करण्यासाठी प्रथम 5500, 5000 व तडजोडअंती 4000 रुपयाची मागणी केली.
तसेच दिनांक 4/3/2025 रोजी च्या पडताळणीत पैसे नसतील तर चणे (हरभरे) ची देखील मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना चणे (हरभरे) द्यावयाचे नसल्याने त्यांनी पैसे देतो म्हणून सांगितले. त्यावेळी कुलकर्णी यांनी पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.
त्या प्रमाणे आज दिनांक 26/3/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान प्रथम 5,000 रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 4,000 रुपये लाच रक्कम ठरले. त्यानंतर कुलकर्णी यांनी तक्रारदार यांना निंभोरा येथे एका शेता जवळ बोलवून लाचेची रक्कम 4,000 रुपये स्वतः स्वीकारली आहे. कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. निभोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोकाॅ राकेश दुसाने, पोकाॅ अमोल सूर्यवंशी यांनी केली.