देवळा :- देवळा-मालेगाव या राज्य महामार्गावरील पिंपळगाव (वा) येथील एम. के पेट्रोल पंपावर सोमवारी दि. 24 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास तीन जणांनी पंपावरील कामगारास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम 6 हजार 140 रुपयांची जबरी चोरी करून येथून पळ काढल्याची घटना घडली. तीनही आरोपींविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील इंडियन ऑइलच्या एम. के. पेट्रोल पंपावर सोमवारी दि. 24 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सचिन बाळु आहिरे, रोशन बाळु आहिरे (दोघे रा. दहिवड, ता. देवळा) व कुणाल संजय पवार (रा. कणकापुर, ता. देवळा) हे विना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवरीलाल यादव (वय 30, रा. सुजनीपुर कत्रोवली ता. राणींगंज जिल्हा प्रतापगढ़ राज्य उत्तरप्रदेश, हल्ली रा. पिंपळगाव वाखारी) या पंपावरील कामगाराला पकडुन खाली पाडले.
त्याला मारहाण केली व यातील एकाने कोयता काढुन धाक दाखविला व दुसऱ्याने त्याकामगाराच्या खिशातुन जबरदस्तीने 6, 140 रुपये रोख रक्कम काढुन चोरी करून पळुन गेले. अजय बनवरीलाल यादव याच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दखल घेत वरील तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सपोनि दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. सोनवणे करीत आहेत.