राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सुरुच असल्याचे समोर येत आहे. पुण्यात शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , नराधमाने खाऊचं आमिष देऊन चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वाघोलीत सोमवारी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी २७ वर्षीय नराधम तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पीडित विद्यार्थिनी ही वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. ती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. शाळकरी मुलगी दररोज ज्या रस्त्याने जाते, त्या रस्त्यावर पिठाची गिरणी आहे. आरोपी तरुण या पीठाच्या गिरणीत कामाला आहे. शाळकरी मुलगी रोज याच रस्त्याने शाळेत ये जा करत होती.
विद्यार्थिनी आज सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली. तेव्हा आरोपीने तिला अडवले. खाऊ देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर काम करत असलेल्या गिरणी परिसरात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळानंतर बाहेर आलेली विद्यार्थिनी रस्त्यावर उभी राहून रडत होती. स्थानिक लोकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. रडत असलेल्या या मुलीला शांत केले.
स्थानिकांनी तिच्याकडे विचारणा केली, त्यानंतर तिने हा संपूर्ण प्रकार सांगितला. पुढे काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातीलया प्रकारानंतर स्थानिकांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.