गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून आजकाल अनैतिक संबंधांचतून तसेच संशयावरून अनेक गुन्हे घडत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान आता अशीच एक खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे.
अनैतिक संबंधांच्या संशयातून 40 वर्षांच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली, यानंतर आता या हत्या प्रकरणातल्या आरोपी महिलेचाही मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. आरोपी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडला आहे. लातूर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मिळालेल्या महितीनुसार , लातूर जिल्ह्यातील करकट्टा गावाजवळ पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शरद इंगळे यांच्यावर विळा आणि इतर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर पोलिसांनी वेगेवेगळ्या दिशांनी तपासाला सुरूवात केली आणि एका व्यक्तीला अटक केली.
हल्लेखोरांनी शरद इंगळे यांचा गळा धारदार शस्त्राने चिरला ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शरद इंगळे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा मुरुद पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. शरद इंगळे यांच्यावर विवाहबाह्य संबंधांमुळे हत्या झाली का? याचा तपास पोलीस करत आहेत.
शरद इंगळे यांच्या हत्याप्रकरणी पाच जणांची चौकशी सुरू असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तसंच यातल्या एका महिला आरोपीचा मृतदेह सोमवारी सकाळी गावातल्या जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडला. शरद इंगळे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 नुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाच्या संवेदनशीलतेचं कारण देत पोलिसांनी अधिक माहिती द्यायला नकार दिला.