नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या युरिया खतामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात कृषी विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्याजवळ असलेल्या आशेवाडी येथील गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रसायने व खते मंत्रालय भारत सरकारचे अवर सचिव चेतना मिना व जिल्हा परिषदेतील मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी हे 5 मार्च रोजी तपासणीसाठी आले होते.
या तपासणी दरम्यान कंपनीच्या गोडाऊनमध्ये टेक्निकल ग्रेड युरियाचा साठा त्यांना आढळून आला. या युरिया खरेदीचे परिपूर्ण दस्तऐवज, बिले, ईवे बिल, डिलिव्हरी चलन, साठा नोंदवही, युरिया दैनंदिन नोंदवही व इतर अनुषंघिक कागदपत्रांची त्यांनी मागणी केली. ही कागदपत्रे देण्यासाठी कंपनीने एक दिवसाची मुदत मागितली. मुदत देऊनही त्यांनी कागदपत्रे न दिल्याने 7 मार्च रोजी पुन्हा सोमवंशी यांनी कंपनीत भेट देत कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर विष्णू बरगट यांनी पूर्ण दस्तऐवज सादर न करता प्रातिनिधीक स्वरुपात 5 बिले सादर केली.
याबाबतची माहिती घेत असताना प्रोडक्शन मॅनेजर विष्णू समाधान बरगट व पवन फाळके यांच्या उपस्थितीत संपूर्ण गोदामाची तपासणी केली असता 90 मॅट्रिक टन पेक्षाही अधिकचा युरिया खतांचा साठा या ठिकाणी मिळाला. शंका आल्याने त्यांनी या युरियाचे नमूने तपासणीसाठी खतनियंत्रण प्रयोगशाळेला पाठविले. त्याचा अहवाल आल्यानंतर हा खुलासा झाला. याबाबतचे बिल व अधिक माहिती सादर करण्यासाठी गोदरेज ॲग्रोव्हेट कंपनीला सादर करण्याचे सांगितले होते, पण ही माहिती त्यांनी दिली नाही.
दरम्यान, मोहीम अधिकारी सोमवंशी यांनी याबाबतची माहिती जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी आमले यांना दिली. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी आमले यांनी दिलेल्या आदेशानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा साठा कंपनीसाठी नसतानाही त्याचा वापर करण्यात आला हे समोर आल्यामुळे युरिया खताचा काळाबाजार करणे व इतर कलमांनुसार हा एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये कंपनीचे मालक, कंपनी व्यवस्थापन, वाहतूक करणारे वाहतूकदार त्याचबरोबर ज्या ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला होता त्या ठेकेदारांचाही यामध्ये समावेश आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.